१० जून, २०१९

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन संपन्न २०१९

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४ वे अधिवेशन संपन्न
मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४ वे अधिवेशन जळगाव येथील कांताई सभागृहात पार पडले. या राज्यस्तरीय अधिवेशनास माननीय खासदार रक्षाताई खडसे, राज्य सहकारमंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या महापौर सीमाताई घोळे, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. राजा माने, राज्यसंघटक संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, राज्यसरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, माजी आमदार श्री. गिरीश चौधरी, लोकमत वृत्तपत्राचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, संघटनेचे राज्यातील जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रथम सत्रात लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी माध्यमाचे बदलते स्वरूप या विषयावर चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या सत्कारानंतर पार पडलेल्या द्वितीय सत्रात प्रास्ताविक करताना संघटक श्री. संजय भोकरे यांनी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या व पत्रकारांवर वेळोवेळी होणारे जीवघेणे हल्ले याबद्दल कायद्याला दिल्लीत मान्यता मिळाली नसल्याचे खासदार रक्षाताई खडसे यांना सांगितले. तसेच पत्रकारांना जोखीम म्हणून दहा लाखाचे विमा कवच द्यावे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना टोलमुक्ती द्यावी, पत्रकारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. यासह विविध मागण्यांचा ठराव पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी या आदिवेशनात मांडले. उपस्थितांनी सर्व ठराव मंजूर केले. प्रसंगी व्यासपीठावर हजर असलेले आमदार गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांच्या या सर्व मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू व त्या मंजूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व पत्रकारितेचा नावलौकिक वाढविणाऱ्या राज्यातील गुणवंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला अशी माहिती दादासाहेब येंधे यांनी दिली आहे. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा