३० सप्टेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीची दुर्गामाता

रंगारी बदक चाळीची दुर्गामाता
मुंबई: रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून हिंदू-मुस्लीम, गुजराती, मराठी, बंगाली अशा सर्व धर्मीयांची मंडळी या देवीला साकडे घालण्यासाठी नवरात्र उत्सवात गर्दी करताना दिसून येतात. विशेष म्हणजे या मातेचे कधीही विसर्जन होत नाही. श्री समर्थ हनुमान मंडळ काळाचौकी यांचेतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान महिलांकडून मोठया प्रमाणात देवीच्या नावाचा जप (नामस्मरण) करून घेतला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांसाठी बडबड गीते, कॅरम -बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. भजन तसेच गरबा-दांडिया रास आयोजन करण्यात आले आहे. सदर मंडळात तरुण-तरुणींचा मोठया प्रमाणात सहभाग असून मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्ता झोडगे, कार्याध्यक्ष श्री. भाऊ पार्टे, सरचिटणीस श्री. संतोष परब, खजिनदार श्री. नागेश नागवेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रौत्सव यावर्षी अधिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली असून दि. ०६ ऑक्टोबर २०१९ रोजी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



















२ सप्टेंबर, २०१९

रंगारी बदक चाळीत यंदा रायगड किल्ल्यातून भारतीय शूर जवानांना मानवंदना

रंगारी बदक चाळीत यंदा रायगड किल्ल्यात भारतीय शूर जवानांना मानवंदना
रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृतकुंभ दानवरूपी नागाने पळविला होता. तो विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाने पुन्हा आणून दिला. त्या दानवरूपी नागावर बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आरूढ आहे. यावर्षी मंडळाने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. रायगड ही शिवकालीन महाराष्ट्राची राजधानी. त्याच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या किल्ल्याची प्रतिकृती उत्सवाच्या दर्शनी भागात सादर करण्यात आली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण थेट जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात हीसुद्धा राजदरबाराची प्रतिकृती आहे. जसं शिवराज्याच्या वेळी न्याय मागण्यासाठी रयत म्हणजे जनता महाराजांकडे जात होती ती कल्पना केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रात महाभयंकर  अस्मानी संकटामुळे जो सांगली, कोल्हापूर येथे  महाप्रलय आला तसा महाप्रलय महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये आणि झालाच तर यशस्वीपणे त्याचा मुकाबला करण्याची ताकत महाराष्ट्रात येऊ दे अशी कल्पना श्री गणपतीला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज समजून केली आहे. नव्हे तसे साकडे घातले आहे अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली असून महाराष्ट्र आलेल्या महापुराच्या संकटात भारतीय सेनेने पुरात अडकलेल्यांना सहाय्य करून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले याच्या विविध प्रतिमा दरबारात लावण्यात आल्या असून एक प्रकारे रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळाने भारतीय सेनेला सलामच केलेला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल हेलेकर, सरचिटणीस श्री. दत्ता झोडगे, खजिनदार श्री. शंकर साळवी यांच्या संकल्पनेतून सदर कथानक सादर करण्यात येत आहे.
आजपर्यंत संत साहित्य, संतांची परंपरा, सामाजिक तसेच नैतिक मूल्यांची जोपासना करणारे विविध आकर्षक देखावे मंडळाने सादर केले आहेत. लोकसहभागातून लोक विकास राष्ट्रविकास या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेनुसार मंडळाने राष्ट्रीय भावना लोकांमध्ये रुजावी, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, राबवली जात आहे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकिका, वेशभूषा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा विविध स्पर्धांतून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करीत असते.