२७ नोव्हेंबर, २०२०

प्रदूषण नियंत्रण आवश्यक


मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये बांद्रा, कुलाबा आदी ठिकाणी भरतीच्या वेळेस पावसाळ्यात मोठा फटका बसतो आहे. यंदा मुंबईत साचलेल्या पावसाचा कहर मुंबईकरांनी दोनदा अनुभवला. मुंबईच्या शहर रचनेमुळे तसेच सखल भागात वस्ती असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. लोकवस्ती जास्त असल्यामुळेही धोका वाढू शकतो. तसेच पाणीप्रदूषण, समुद्रात कचरा, प्लॅस्टिक टाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढत आहे.

 त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन, हरित वायू आणि प्रदूषणावर नियंत्रण आणले नाही तर हा वेग भविष्यात वाढण्याचाही धोका आहे. वातावरणाचे भयानक परिणाम देखील आपण अनुभवतो आहोत. पावसाळ्यात अचानक जोरदार पाऊस येणे, नंतर बरेच दिवस पाऊस न येणे, पुन्हा जोरदार पाऊस असा अनुभव दरवर्षी येतो. एवढेच नव्हे तर आज घडीला भुजलसाठ्याचा उपसा वाढल्याने नद्यांमध्ये पाणी टिकून रहात नाही. यासाठी भुजलसाठ्याचा वापरही वाढणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रे वाढली पाहिजेत. विकासाला पूरक असे बदल घडवायला पाहीजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

फटाक्यांपासून दूर राहा

 फटाक्यांपासून दूरच राहा

काही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई