२८ मार्च, २०२०

पोलीसांतील माणुसकीचे दर्शन

संचारबंदीत पोलीसांतील माणुसकीचे दर्शन
दादासाहेब येंधे, मुंबई: करोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलीस फटक्यांचा प्रसाद देताना सर्वांनी पाहिले. विविध सोशल मीडियावर ते व्हिडिओ शेअरही केले. पण, याच कठोर वाटणाऱ्या पोलिसांची माणुसकी कुणालाही दिसत नाही. 
शहरात रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खाऊगल्ल्या, हातगाड्या, हॉटेल बंद झाल्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचे, गरिबांचे हाल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे  त्यांच्या उपजीविकेची सर्व संसाधने बंद झाली आहेत. अशा गरिबांना मास्क वाटप करून त्यांना जेवण देऊन पोलीस दल आपली माणुसकी जपत असल्याचे चित्र जणू दिसून येत आहे.

रस्त्यावरील गरीब व्यक्तीला जेवण देताना, जोगेश्वरी, मुंबई

रस्त्यावरील गरिबांना मास्क देताना

मास्क वाटप२७ मार्च, २०२०

संचारबंदी मोडणाऱ्यांना लाठीचा प्रसाद

मुंबई, दादासाहेब येंधे : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करीत असताना नागरिकांना अजूनही करोनाचा धोका समजलेला दिसत नाही. संचारबंदी आणि लॉक डाऊन जाहीर केल्यानंतरही शहरांत नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली बिनधास्तपणे संचार करत आहेत. औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली फेरफटका मारत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्यास सुरूवात केली आहे. 
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर केली असली तरी नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे. तर काही ठिकाणी पोलिसांवरच हात उगारल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मदत करणे गरजेचे आहे.

पोलिसांवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ


गावाकडे जाऊन विहिरीत एकत्र पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना

संचारबंदी असतानाही बाईकस्वार फिरतानासोशल मिडियांवर व्हायरल झालेले काही व्हिडिओ.२२ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांबद्दल कृतज्ञता

जनता कर्फ्युला देशवासीयांकडून प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी संध्याकाळी ५.०० ते ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत आपल्या घरातून, खिडक्यांत उभे राहून, गॅलरीतून  भांडी, घंटा, शंख आणि टाळ्या वाजवून करोना विषाणू विरोधात लढत असलेल्या लोकांचा सन्मान केला.
आम्ही या विषाणूशी लढण्यास वचनबद्ध आहोत असा संदेश जणू मुंबईकरांनी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे.जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद


जनता कर्फ्युला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वतःसाठी घराबाहेर पडू नका, जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळावा या केलेल्या आवाहनाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकर देताना दिसत आहेत.
करोना या विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलं होतं त्याला मुंबईकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत. मुंबईतच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत रस्त्यांवर लोकल आणि बसमध्ये प्रवाशी नसल्याने शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने घड्याळाच्या काट्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई आज शांत झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.१७ मार्च, २०२०

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
जगात तसेच आपल्या देशात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्यातही रुग्ण आढळल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, तर त्याला टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आपली दैनंदिन कामे ऑनलाइन आणि मोबाइलचा वापर करून कामे करावीत. मिटिंगपेक्षा फोन कॉलकरून अशा गोष्टी साधा. वेळोवेळी हात धुवावेत. कपडे स्वच्छ ठेवावेत. मास्क न मिळाल्यास स्वच्छ रुमाल वापरावा. चिकन अंडी योग्य प्रमाणात शिजवून खावीत. इम्युनिटी वाढवा. अशी काळजी घेतल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता नक्कीच कमीच होईल. नागरिकांनी कोरोनाविषयीचे व्हॉटसअप, फेसबुकवर येणारे मेसेजेस वाचणे टाळावे. कोणतीही समस्या असेल तर पालिकेच्या किंवा शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून माहिती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच अफवा पसरवू नये. परदेशातून आलेल्या काही नागरिकांमुळे ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव काही नागरिकांना झालेला आहे. त्यामुळे जितक्या काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक व्यक्तीकडून पाळल्या जातील तितके यातून नुकसान टळणार आहे. ज्या सोशल मीडियातून भीतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, त्याच माध्यमाचा वापर करून याबाबतीत लोकांची मने तयार करणे आणि अशी सकारात्मक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, टी. बी., अशा आजारांना भारत सामोरा गेलेला आहे. कोरोना हा काही त्याहून वेगळा नाही. फक्त तो नव्याने आल्याने त्यावरील उपायांची व्यवस्था होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.  -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई


८ मार्च, २०२०

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दादासाहेब येंधे, मुंबई: चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २८ व्या रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. २८ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखणे व कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा पाठिंबा न घेता विविध कार्यक्रम राबविणे तेही निःस्वार्थपणे हे फक्त कल्पतरू समूहच करू शकते असे समूहाला संबोधताना श्री. रोहिदास लोखंडे म्हणाले. तर रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधतांना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत. ही मोठी कौतुकाची बाब आहे.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील परब, सुनिकेत, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विकास सक्रे, विनायक येंधे, समीर नाईक तसेच सौ. करुणा, वर्षा पाटील, अश्विनी,  वैष्णवी, अर्चना, वनिता साळसकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.