१७ जुलै, २०१९

आणखी किती बळी घेणार?

आणखी किती बळी घेणार?
मुंबई, दादासाहेब येंधे : डोंगरी येथील तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई-२ तीन मजली अनधिकृत इमारत मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास  अक्षषरशः जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुषांचा, चार महिलांचा समावेश असून इमारत एकाच जागेवर कोसळल्याने घटनास्थळी मोठा ढिगारा होऊन त्याखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केसरबाई-२ ही अनधिकृत इमारत डोंगरी येथे उभारण्यात आली होती. केसरबाई मध्ये चार ते पाच कुटुंब आणि काही व्यवसायिक गाळे होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ही इमारत थोडी हलल्यासारखी वाटली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वरचे तीन मजले अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले असे येथील रहिवासी सांगतात. इमारतीजवळ असणाऱ्या बेकरीतील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनडीआरएफ, पोलीस, अग्निशामक दल यांनी रात्री ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले होते. यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला असून ढिगारा उपसण्याचे काम रात्रभर चालू होते.
डोंगरीतील अनधिकृत इमारत कोसळण्याच्या वृत्ताने मुंबईमधील धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा काळजाचा ठोका चुकला आहे. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे संक्रमण शिबिरे पुनर्रचित इमारती उपकरप्राप्त इमारतींच्या देखभालीची जबाबदारी आहे. खाजगी मालकीच्या असलेल्या इमारती जुन्या झाल्यानंतर त्यांची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली जाते. अशा अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. म्हाडाकडून अतिधोकादायक इमारत त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात येतात. पण, बरेच रहिवाशी आपले मूळ घर सोडून संक्रमण शिबिरात जाण्यास तयार होत नाहीत. अशा दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने सेस इमारती असून संक्रमण शिबिरात गेल्यास आपल्याला मूळ घरांचा ताबा कधी मिळेल याची त्यांना हमी मिळत नाही. तसेच संक्रमण शिबिरांचीही अवस्था चांगली नाही. तेथेही रहिवाशांच्या तक्रारी आहेत. मंडळाच्या कारभारावर विश्वास नसल्याने धोकादायक इमारतीतील लोक आपले मूळ घर सोडून जाण्यास तयार नाहीत.
केसरबाई-२ ही इमारत अनधिकृतच होती असे गृह निर्माण मंत्री  विखे पाटील यांनी विखे पाटील यांनी जे. जे.  रुग्णालय मध्ये जखमींची चौकशी करण्यासाठी आले असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  या इमारतीच्या शेजारील इमारतीला पुनर्विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.  धोकादायक इमारत म्हणून महापालिका आणि म्हाडा दोघांकडूनही शेजारील इमारतीला नोटीस देण्यात आली होती. मात्र केसरबाई-२ या इमारती संदर्भात संपूर्ण माहिती इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांकडे असणे अपेक्षित होते. पण, तशी नोंद सरकारकडे नसल्याने त्याला नोटीस देण्यात आली नव्हती. खरेतर अशा प्रकारची इमारत उभी राहत असतानाच वार्ड अधिकारी, म्हाडा अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते. ते या घटनेस जबाबदार आहेत. आणि त्याबाबतीत कारवाई होणे गरजेचे आहे. शंभर वर्षे जुन्या या इमारतीला लागुन १९९० च्या दरम्यान अनधिकृत बांधकाम केले जाते. मूळ इमारत धोक्कादायक ठरविली जाते. आणि तरीदेखील सरकारी यंत्रणांच्या हे बांधकाम अनधिकृत असल्याचे लक्षात येत नाही. हा बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल.

४ टिप्पण्या:

  1. बेजबाबदारपणाचे बळी. सरकारला काही देणेघेणे नाही. दरवर्षी मुंबईत इमारती कोसळून निष्पाप नागरिक मारले जातात.चार दिवस चर्चा होईल. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती.

    उत्तर द्याहटवा
  2. दादा, आपण योग्य विषयावर लिहिले आहे. सरकारने जुन्या इमारती खाली करायला हव्यात. रहिवाश्यांना सरकारने विश्वासात घ्यायला हवे.

    उत्तर द्याहटवा
  3. सरकारने रहिवाश्यांना विश्वासात घेऊन त्यांना मोडकळीस आलेल्या इमारती खाली करावयास सांगावे. अथवा बळाचा वापर करून मोडक्या इमारती खाली कराव्यात.

    उत्तर द्याहटवा