४ एप्रिल, २०२०

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोशल मिडियामधून तेढ पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई, दादासाहेब येंधे :  कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू, माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या ७ वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा  आवर्जून उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.
एकजुटीला गालबोट लावू देणार नाही कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच. राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही. इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसा. हा विषाणु कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. (महासंवाद)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा