स्वरतरंग कार्यक्रमाला राज्यपालांनी लावली हजेरी
दादासाहेब येंधे (मुंबई): मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या 'स्वरतरंग २०१९' या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले होते. हा कार्यक्रम मुंबई पोलिसांसाठी फार मोठा वार्षिक सोहळा असतो. प्रत्येक मुंबई पोलीस या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील दिगग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. २४ तास जनतेचे संरक्षण करीत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या पोलिसांसाठी 'स्वरतरंग' हा कार्यक्रम म्हणजे मोठी पर्वणीच असते.
बृहन्मुंबई पोलिसांच्या 'स्वरतरंग २०१९' या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सदर कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थित पोलीस व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जिमखाना, मरीन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त नवल बजाज, विनयकुमार चौबे, उपायुक्त एन. अंबिका आदी उपस्थित होते. मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय बर्वे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमादरम्यान 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच विविध गाण्यांवर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी नृत्ये व गीते सादर केली. अभिनेता अभिजित खांडकेकर व मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा