वृत्तपत्र लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वृत्तपत्र लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ मार्च, २०२१

काय शिकवलं कोरोनानं...?

कमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव 

कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद..  घराचं दार बंद... कोणाकडे जायचे नाही, यायचं नाही. कुणाशी हात मिळवायचा नाही. आणि थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. हे सगळं कसं जमायचं. असं वाटत होतं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होते. युद्ध नाही, लढाई नाही तर एका आजाराने मात्र लांबच लांब तोही कडकडीत बंद पाळायला भाग पाडले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, सुरुवातीला अशक्य वाटणारा लॉक डाऊन वाढता वाढता अनलॉकही झाला. या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले.


कोरोनाने लोकांना बरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवले. पण, आपल्या लोकांनी यातून 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असा सकारात्मक आशय काढून एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. खरं तर एकत्र कुटुंबात राहणे ही आपली जुनी परंपरा आहे. पण हल्लीच्या पिढीला एकत्र कुटुंबात राहणे हे फारसं पटत नसल्यामुळे हळूहळू कुटुंब विभक्त होत गेली. कोणीही याचा गंभीरपणे विचार केला नाही. आज लॉक डाऊनच्या दरम्यान लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. आपल्याला खरं वाटणार नाही पण आजही काही कुटुंबांमध्ये पंधरा-सोळा माणसे एकत्र राहत आहेत. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. याउलट आपले स्वतःचे घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला.


या काळात कुटुंबासोबत राहताना प्रत्येक सदस्याला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. विनाकारण केला जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या लॉक डाऊनने आम्हाला दिला. ऑफिससाठीच्या धावपळीमुळे बऱ्याच जणांना आपल्या आवडीनिवडी जोपासता येत नव्हत्या. वाचनाची आवड आहे. परंतु वाचायला सवड नव्हती अशी सबब असते. पण या लॉक डाऊन मध्ये मात्र आम्ही बरीच पुस्तकं वाचली. काही संग्रहित केली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग उरलेल्या वेळात घरात मुलांसोबत बसून कॅरम, जुन्या वर्तमानपत्रांची फुले बनवणे असे खेळ खेळता आले. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसे जगायचे हे शिकविले.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई



२२ फेब्रुवारी, २०२१

भिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज

 

मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सामाजिक सामाजिक संस्थांची मदत घेत असतात आणि त्यांना पकडून सुधारगृहात पाठवितात. कधीकधी लहान मुलांना अपहरण करून किंवा चोरी करून आणून भीक मागण्यास बसविले जाते किंवा सिग्नलवर उभे केले जाते. लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. आज घडीला मुंबईत सिग्नल, मंदिर, मस्जिद, चर्चच्या समोर भिकाऱ्यांनी ठाण मांडलेले दिसून येते. सिग्नलवर तर कारचालकाकडे, गाडीत बसलेल्यांकडे हात पुढे करताना कित्येकजण दिसून येतात. तर गाडी अडविल्याचेही कित्येककदा दिसून येते. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या वाढून न देणे, त्यांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. सिग्नल, मंदिरे, मशिदी, चर्च, रेल्वे स्थानाके, टोल नाके ही भिकाऱ्यांची हात पसरायची मुख्य ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांवर स्थानिक संस्था, एनजिओंची मदत घेऊन पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई 

२० फेब्रुवारी, २०२१

बेपर्वा प्रवाशांवर कारवाई व्हावी


सध्या बऱ्याच रेल्वे स्थानकांत लोकल प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करत सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. एवढेच नव्हे तर कित्येक लोकल रेल्वे स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यातील जागा बघून थुंकतात. तर रुळावरही पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. स्वतः सोबत सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन व जीआरपी यांनी कारवाई करावी.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

२७ नोव्हेंबर, २०२०

फटाक्यांपासून दूर राहा

 फटाक्यांपासून दूरच राहा

काही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

१७ सप्टेंबर, २०२०

आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज


 आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज

कोरोना विषाणूचा संसर्ग सोडवण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे उत्पादनव्यवस्था, उद्योग, व्यवसाय सर्वकाही ठप्प झाले. कित्येक जणांचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी, जीडीपी जवळपास २४ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे जीएसटीचे कर संकलन कमी झाल्याने राज्यांना नुकसान भरपाई देण्याची क्षमता केंद्राकडे राहिलेली नाही. अनलॉकनंतर हळूहळू उद्योग व्यवसाय पूर्ववत होत असले तरी खालच्या स्तरातून मागणी नसल्याने परिस्थिती सुधारताना दिसत नाही. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हा आर्थिक मंदीचे सावट होतेच त्यात कोरोनाचे महासंकट आले. आज जवळपास सर्वच अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकारने अर्थव्यवस्थेसाठी काही भरीव तरतूद न केल्यास मंदीमधून बाहेर पडण्यासाठी आणखी एक-दोन वर्षं लागू शकतील. जे देशाला परवडणारे नाही.


खरेतर १९२९ च्या महामंदीनंतर केनेने इंग्लंडमध्ये सांगितले तेच आज भारताला लागू करणे गरजेचे आहे. त्यानुसार खासगी लोक गुंतवणूक करीत नसतील तर सरकारने गुंतवणूक करावी. रोजगार निर्माण करावा. सरकारी खर्च वाढवावा. काही जमले नाही तर लोकांना खड्डे करण्यासाठी कामाला लावा आणि ते बुजवण्यासाठीचेही काम द्या. खड्डे खोदा आणि आपण लोकांच्या हाती पैसा द्या, असे केन या प्रसिद्ध अर्थतज्ञाने म्हटले होते. आज केंद्र सरकारने तेच करायला हवे. सरकारने आपली महसुली तूट वाढली तरी चालेल परंतु आपली मदत वाढवायला पाहिजे. जीएसटी कौन्सिलमध्ये ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार  एकत्र येऊन विचारविनिमय करतात. रोजगार निर्मितीसाठी आणि आर्थिक परिस्थिती साठी अशाच कौन्सिल निर्माण करण्याची गरज आहे, त्यातून जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई




१० सप्टेंबर, २०२०

शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता

 शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता

स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर सध्या अनेक देशांमध्ये सुरू आहे. ज्यामुळे पीक व्यवस्थापन, पाऊस, पिकांवरील कीड रोगाचा प्रादुर्भाव, जमीन, माती, पीक व्यवस्थापन यांची एकत्रित माहिती सेन्सर व ड्रोनचा वापर करून मिळत आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर सध्या होत आहे. परंतु, जगाच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी वापर आपल्याकडे आहे. बाहेरील तंत्रज्ञान आपल्या देशात आणून त्याचा वापर केल्यास अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील. शेतीसाठी नियामक कृषी लागवड नवे धोरण जाहीर करून जमिनीचा पोत तपासून कुठले पीक किती एकरात घ्यायचे याचा निर्णय पेरणी अगोदर सरकारने जाहीर केल्यास फायदा होईल. त्यामुळे शेती वटहुकुमाचा लाभ शेतकऱ्याला होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास भारत कृषिप्रधान देश म्हणून शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोलाची साथ मिळेल. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई




९ सप्टेंबर, २०२०

बोगस बियाणे शेतकऱ्यांना मदत करा

 बोगस बियाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

खरीप पीक पेरणी मध्ये बियाणे उगवण झाली नसल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्रतल्या सर्वच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामध्ये प्रामुख्याने बियाणे महामंडळ व इतर अनेक कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या बदल्यात त्यांना बी, खते, मशागत, मजुरी सहित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या कंपन्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा. बोगस बियाणे विरोधात त्वरित कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. असा कायदा सध्या राज्य सरकारने फक्त कापूस बियांसाठी केला आहे. तो सर्व पिकांसाठी झाला पाहिजे. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया मध्ये जनुकीय बियाणे वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन ५० क्विंटल निघते. चीनमध्ये तीच परिस्थिती आहे. अधिक उत्पन्न असल्यामुळे त्यांना कमी दरात धान्य विकणे परवडते, तेच भारतीय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समिती यांनी अद्याप बी.टी. वांगे व इतर वाणाला परवानगी दिली नाही. जैविक बियाण्याला परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना मदत होणार आहे.- दादासाहेब येंधे, पुणे




१७ मार्च, २०२०

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या
जगात तसेच आपल्या देशात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्यातही रुग्ण आढळल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, तर त्याला टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांनी खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. आपली दैनंदिन कामे ऑनलाइन आणि मोबाइलचा वापर करून कामे करावीत. मिटिंगपेक्षा फोन कॉलकरून अशा गोष्टी साधा. वेळोवेळी हात धुवावेत. कपडे स्वच्छ ठेवावेत. मास्क न मिळाल्यास स्वच्छ रुमाल वापरावा. चिकन अंडी योग्य प्रमाणात शिजवून खावीत. इम्युनिटी वाढवा. अशी काळजी घेतल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता नक्कीच कमीच होईल. नागरिकांनी कोरोनाविषयीचे व्हॉटसअप, फेसबुकवर येणारे मेसेजेस वाचणे टाळावे. कोणतीही समस्या असेल तर पालिकेच्या किंवा शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करून माहिती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उगाचच अफवा पसरवू नये. परदेशातून आलेल्या काही नागरिकांमुळे ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव काही नागरिकांना झालेला आहे. त्यामुळे जितक्या काटेकोरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक व्यक्तीकडून पाळल्या जातील तितके यातून नुकसान टळणार आहे. ज्या सोशल मीडियातून भीतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे, त्याच माध्यमाचा वापर करून याबाबतीत लोकांची मने तयार करणे आणि अशी सकारात्मक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, टी. बी., अशा आजारांना भारत सामोरा गेलेला आहे. कोरोना हा काही त्याहून वेगळा नाही. फक्त तो नव्याने आल्याने त्यावरील उपायांची व्यवस्था होईपर्यंत प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.  -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई