कमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव
कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घराचं दार बंद... कोणाकडे जायचे नाही, यायचं नाही. कुणाशी हात मिळवायचा नाही. आणि थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. हे सगळं कसं जमायचं. असं वाटत होतं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होते. युद्ध नाही, लढाई नाही तर एका आजाराने मात्र लांबच लांब तोही कडकडीत बंद पाळायला भाग पाडले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, सुरुवातीला अशक्य वाटणारा लॉक डाऊन वाढता वाढता अनलॉकही झाला. या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले.
कोरोनाने लोकांना बरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवले. पण, आपल्या लोकांनी यातून 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असा सकारात्मक आशय काढून एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. खरं तर एकत्र कुटुंबात राहणे ही आपली जुनी परंपरा आहे. पण हल्लीच्या पिढीला एकत्र कुटुंबात राहणे हे फारसं पटत नसल्यामुळे हळूहळू कुटुंब विभक्त होत गेली. कोणीही याचा गंभीरपणे विचार केला नाही. आज लॉक डाऊनच्या दरम्यान लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. आपल्याला खरं वाटणार नाही पण आजही काही कुटुंबांमध्ये पंधरा-सोळा माणसे एकत्र राहत आहेत. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. याउलट आपले स्वतःचे घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला.
या काळात कुटुंबासोबत राहताना प्रत्येक सदस्याला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. विनाकारण केला जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या लॉक डाऊनने आम्हाला दिला. ऑफिससाठीच्या धावपळीमुळे बऱ्याच जणांना आपल्या आवडीनिवडी जोपासता येत नव्हत्या. वाचनाची आवड आहे. परंतु वाचायला सवड नव्हती अशी सबब असते. पण या लॉक डाऊन मध्ये मात्र आम्ही बरीच पुस्तकं वाचली. काही संग्रहित केली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग उरलेल्या वेळात घरात मुलांसोबत बसून कॅरम, जुन्या वर्तमानपत्रांची फुले बनवणे असे खेळ खेळता आले. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसे जगायचे हे शिकविले.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई